Wednesday, December 25, 2019

एक जुनं घड्याळ



एक जुनं घड्याळ 
खूप पावसात भिजलं 
घडलं विपरीतच 
ते मुळीच नाही थिजलं 

येता जाता त्याची 
ज्यांनी थट्टा केली 
त्यांचीच हो आता 
वेळ झोपी गेली 

काट्यांचं चक्रव्यूह 
असं काही रंगलं 
कमळाचं पोर जाऊन 
घड्याळात भंगलं 

मग घड्याळातून काटे 
बाहेर पडलेत  
कमळाचं हस करून 
उलट फिरलेत 

घड्याळ अन वाघाची 
मग निघाली स्वारी 
लोटांगण घालत 
आली पंजाच्या दारी 

बिथरलेला वाघ 
आटोक्यात आला 
गर्जत म्हणे 
सत्ता लागतेय हाताला 

अशी हि सर्कस 
फुकट बघायला 
महाराष्ट्र उभा 
शाई लावून बोटाला 

वाघ हा किती काळ 
घड्याळीवर चालेल 
कि पंजात अडकून 
स्वतःला चावेल 

कमळ बसलय निवांत 
चिखल होताना पाहून 
माहित आहे त्याला 
वेळ पुन्हा येणार धावून 

Wednesday, October 17, 2012

|| कालाय तस्मै नमः ||



काळाच्या ओघात सर्व हरवून जातं अगदी भाषा सुद्धा? मग इंग्लिश का नाही हरवली गेल्या इतक्या वर्षात? आपल्याच भाषेचा ऱ्हास होतोय? का आपण करतोय? अनेक शब्द कालबाह्म होत आहेत कि आपण त्यांना करतोय? न कळतच दूर जातोय आपण आपल्या स्वतः पासून आणि म्हणवून घेतोय कि आम्ही सुधारतोय! खरंच का? दुसऱ्याच ते सोनं आणि आपलं ते पितळ?

आज अगदी घराघरात आपला मुलगा इंग्लिश माध्यमातून शिकावा म्हणून जीवाचा आटापिटा करणारे पालक दिसतात. पण आपल्या मुलाला एखादी गोष्ट सहज कशी समजेल आणि त्यातून त्याची प्रगती कशी होऊ शकेल असा विचार करणारे लोक विरळाच!
आल लक्षात काय म्हणताय तुम्ही ते; पण इंग्लिश न शिकता आपण पुढे जाऊच शकत नाही अस तर वाटत नाहीये न? आपल्या मातृभाषेला अगदी हीन तर लेखत नाहीये न आपण?

जरा अतीच होत आहे... मी पण काही वेगळा नाही. अगदी रोजच्या वापरातले शब्द जे लहान असताना अगदी नेहमी ऐकू यायचेत ते आता सहसा ऐकू येत नाहीत त्यामुळे मन विषण्ण झालं, का नाही होणार .. हे बघा:
अगं, बँकेत अकाउंट ओपन करून येतो. (काय??)
अगं, पतसंस्थेत खाते काढून येतो... आपण काही हरवतोय का कुठे?
उदाहरण देण्यापेक्षा एक छोटीशी यादीच करू हरवलेल्या किंवा हरवत असलेल्या शब्दांची:
      चेक = धनादेश
      फोन = दूरध्वनी
      रिझल्ट = निकाल
      कम्प्युटर = संगणक
      डॉक्टर = वैद्य
      इंजिनियर = अभियंता
      लाईट = दिवा
      रोड = रस्ता
      स्क्वेयर = चौरस्ता
      डिसिजन = निर्णय
शोधाल तेवढे कमी आणि वापरालं तेवढे जास्त शब्द आहेत आपल्याकडे ... मी तर वापरणार, किमान मराठी बोलताना तर नक्कीच, तुम्ही?